महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान देणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार, शेती, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी असून, त्यांचे जीवनकार्य समाजकारणासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवौद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, भाऊसाहेबांनी आयुष्यभर तत्त्वांची जपणूक करत सामान्य माणसाच्या विकासासाठी पारदर्शक संस्थात्मक जाळे उभारले आणि ‘राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजाच्या विकासासाठी असते’ हा विचार रुजवला.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भाऊसाहेबांना ‘सहकारातील संत’ संबोधून त्यांच्या निस्पृह कार्याचा गौरव केला.
१२ जानेवारी हा ‘प्रेरणा दिन’ म्हणून संगमनेर तालुक्यातील गावोगावी प्रभात फेऱ्या, आरोग्य शिबिरे, रक्तदान, क्रीडा स्पर्धा आणि कृषी प्रदर्शने अशा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी मानले.
