शिर्डी:
प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. अवैध वाळू उपसा करणारी व्यक्ती किंवा कार्यकर्ता कोणाचाही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
लोणी येथे गुरुवारी आयोजित ‘जनता दरबार’ उपक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. या दरबारात प्रवरा नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाची तातडीने बैठक घेतली. ज्या भागातून वाळू उपसा होत असेल, त्याची जबाबदारी संबंधित गावातील तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर निश्चित करून वेळप्रसंगी त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाच्या नावाखाली अशा बेकायदेशीर कृत्याला सहकार्य करणाऱ्यांची गय करू नका, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या बैठकीला संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आचारसंहिता शिथिल झाल्याने आता शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित विकासात्मक कामांना प्राधान्य द्यावे आणि ती तातडीने मार्गी लावावीत, असे आवाहनही डॉ. विखे पाटील यांनी यावेळी केले.

