महासंगम न्यूज ऑनलाईन
संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कॉंक्रिटिकरण आणि पुलांच्या अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने निवेदन पाठवले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत या महामार्गावरील टोलवसुली त्वरित थांबवावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

आमदार तांबे यांनी पत्रात महामार्गाच्या सद्यस्थितीवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. पूर्वी संगमनेर ते नाशिक हे अंतर अवघ्या एका तासात पूर्ण होत होते, मात्र आता त्याच अंतरासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत आहे. विशेषतः नाशिक ते पुणे हा प्रवास तब्बल सहा तासांपर्यंत वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. महामार्गावर सर्वत्र मोठमोठे खड्डे, खराब नियोजन आणि अपुरे वाहतूक व्यवस्थापन असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची कामे अत्यंत संथ असल्यामुळे प्रवाशांना तासंनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे, ज्यामुळे वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.

तांबे यांनी घुलेवाडी (ता. संगमनेर) आणि नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील पुलांच्या कामांकडे लक्ष वेधले. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाची अवस्था दयनीय असतानाही, शिंदे पळसे (ता. नाशिक), हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) आणि चाळकवाडी, आळेफाटा (ता. जुन्नर) येथील टोल नाक्यांवर नियमितपणे टोल वसुली सुरू आहे. रस्त्यांची सुविधा नसताना टोल आकारणे हे प्रवाशांवर अन्यायकारक असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करावी, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे. त्यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. नाशिक-पुणे महामार्गावरील सुरू असलेल्या कामांचा वेग तातडीने वाढवावा आणि रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली थांबवावी. हा महामार्ग दररोज हजारो प्रवाशांच्या जीवनाशी जोडलेला असल्याने, केंद्र सरकारने या विषयावर तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली आहे.