संगमनेर-
आपसातील सर्व हेवेदावे, मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून आता फक्त भगव्यासाठी आणि शिवसेनेसाठी मैदानात उतरा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे फेरबदल पक्षासाठी फायदेशीर ठरतील आणि त्या जोरावर सत्तेवर भगवा झेंडा निश्चितपणे रोवला जाईल, असा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना दिला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संगमनेर तालुक्यात आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. गुंजाळवाडी येथील शिवसेनेचे निष्ठावंत आणि माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी मंगळवारी (दि. १३) पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या बैठकीत बोलताना सचिन कोते पुढे म्हणाले की, मुंबईतील शिवाजी पार्कवर जमलेला जनसागर ही केवळ सभा नव्हती, तर ती संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देणारी गर्जना होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आता परिवर्तन अटळ असून, राज्य नव्या ऊर्जेने जागे होत आहे. पदाधिकारी नेमणुकांबाबत पक्षश्रेष्ठींचे निर्णय अंतिम असतील, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंकडे संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या आशेने पाहत आहे.
तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सांगितले की, गटबाजी आणि अहंकार बाजूला सारून पक्षाची वज्रमुठ आवळण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण सर्व कडवे आणि एकनिष्ठ शिवसैनिक आहोत हीच आपली खरी ओळख असून, आगामी प्रत्येक राजकीय संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी सर्वांनी दर्शवली आहे. नगरपालिकेप्रमाणेच आता पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्येही शिवसेनेच्या माध्यमातून परिवर्तन घडणारच, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी यावेळी महत्त्वाची सूचना मांडली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढण्यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत विनंती करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांना बळ दिले. बैठकीत उपस्थित इच्छुक उमेदवारांनीही आपली बाजू मांडली. युवा सेना तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ यांनी शिवतीर्थावरील जनसागर खूप काही सांगून गेला आहे असे म्हणत, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरेल असे नमूद केले. तर तळेगाव भागाचे युवा सेना तालुकाप्रमुख सागर भागवत यांनी जिल्हा परिषदेसाठी आपली उमेदवारी जाहीर करत पक्षप्रमुखांचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य असल्याचे सांगितले.
या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना पक्षाच्या अधिकृत दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण करण्यात आले. या मेळाव्याला माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ, अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष आशाताई केदारी, सुनील देशमुख, प्रकाश क्षत्रिय, योगेश गुंजाळ, संदीप गुंजाळ, प्रकाश गायकवाड, रंगनाथ फटांगरे, भीमा पावसे, अमित फटांगरे, अशोक बडे, संजू सोनावणे, संदेश देशमुख, भाऊसाहेब वराळे, अमोल डुकरे, बाळासाहेब कवडे, राजू सातपुते, स्वप्नील उदावंत यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
