संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आता शहराच्या कारभाराची सूत्रे अधिकृतपणे ‘टीम डॉ. मैथिली तांबे’च्या हाती सोपवण्यात आली आहेत.
नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी ‘संगमनेर सेवा समिती’चे नूरमोहम्मद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याच सोहळ्यात शहराच्या विकासाला गती देण्यासाठी रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करून सत्तेचे समीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी मांडलेला ‘संगमनेर २.०’ हा जाहीरनामा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी या निवडींमध्ये एक विशेष ‘मास्टरस्ट्रोक’ पाहायला मिळत आहे. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत सोशल इंजिनीअरिंगचा अचूक वापर करण्यात आला असून, सर्वसमावेशकता आणि दांडगा अनुभव यांचा समतोल साधण्यात आला आहे.
विशेषतः, प्रसिद्ध उद्योजक मालपाणी परिवारातील रचना मालपाणी यांची निवड करून आमदार सत्यजित तांबे यांनी शहराच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एक नवा आणि आधुनिक ‘फॉर्म्युला’ समोर आणला आहे. मालपाणी परिवाराचा सत्तेतील सहभाग हा शहराच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘सेवा समिती’ने या निवडणुकीत विरोधकांना अक्षरशः भुईसपाट केले आहे. नगरपरिषदेच्या २८ पैकी २७ जागा जिंकत थोरात-तांबे गटाने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या निवडणुकीत भाजपला आपले खातेही उघडता आले नाही, तर आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेची केवळ एक महिला उमेदवार निवडून येण्यात यशस्वी झाली, बाकी सर्वत्र सेवा समितीचा गुलाल उडाला.
नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी स्वतः १६ हजारांहून अधिक मताधिक्य घेत सुवर्णा खताळ यांचा पराभव केला होता, यामुळे या नव्या टीमचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे.
उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, स्वीकृत नगरसेवक रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे, जावेद पठाण या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच संगमनेर पालिकेच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष केला. सत्तेच्या या नव्या समीकरणातून आता ‘संगमनेर २.०’ अंतर्गत प्रलंबित प्रश्न आणि शहराचे आधुनिक रूप किती वेगाने आकाराला येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
