Sat. May 30th, 2026

संगमनेर –

फिनलंडमधील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर आता संगमनेर शहरातील नगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी कंबर कसली आहे. समाजातील सामान्य आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या या शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शाळांच्या कामकाजाची पाहणी सुरू केली आहे. यामुळे लवकरच नगरपालिकेच्या शाळांचे रूप पालटणार असल्याचे संकेत मिळत असून शैक्षणिक क्षेत्रात या दौऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे.

बदलत्या काळानुसार शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा होणे गरजेचे असल्याचे ओळखून डॉ. मैथिली तांबे यांनी शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक समितीच्या सभापती डॉ. अनुराधा सातपुते आणि शिक्षणाधिकारी जाहिद शेख यांच्यासह शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या.

यामध्ये जनता नगरमधील राजमाता जिजाऊ शाळा, अशोक चौकातील स्व. इंदिरा गांधी शाळा, स्वातंत्र्य चौकातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा, चव्हाणपुरा भागातील स्व. कल्पना चावला शाळा आणि घासबाजार येथील अहिल्यादेवी कन्या शाळा यांचा समावेश होता.

या दौऱ्यादरम्यान डॉ. तांबे यांनी केवळ औपचारिक भेट न देता प्रत्येक शाळेतील वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि शैक्षणिक साहित्याची बारकाईने पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शिक्षकांच्या अडचणीही जाणून घेतल्या. केवळ कागदी अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

फिनलंडमधील धर्तीवर स्थानिक शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी डॉ. तांबे आग्रही असून, त्रुटी आढळलेल्या ठिकाणी त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या पुढाकारामुळे आता सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळणार असून, संगमनेरमधील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणार असल्याचा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!