संगमनेर –
चॉपरने हल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मुख्य आरोपी बंटी आरगडे याने पीडितावर चॉपरने वार केल्याने पीडिताला आपला डावा पंजा गमवावा लागला होता. या घटनेवेळी वैष्णव आव्हाड तिथे उपस्थित होता आणि त्याने आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता.

मात्र, सुनावणी दरम्यान अर्जदाराच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, एफआयआरमध्ये वैष्णवच्या विरोधात कोणत्याही हिंसक कृतीचा उल्लेख नाही. तो केवळ १९ वर्षांचा असून त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तसेच तो तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ घटनास्थळी उपस्थित असल्याच्या कारणावरून कोठडीत घेऊन तपास करणे आवश्यक वाटत नाही. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहेत, यानुसार संशयिताला २१ जानेवारी २०२६ पासून सलग १० दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच साक्षीदारांवर दबाव न टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. राजू बबनराव खरे व ॲड. विजय देवगिरे यांनी काम पाहिले.
