शब्दांकन : राहुल सोमवंशी
महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार हे नाव ठामपणे आणि प्रभावीपणे उभे राहिले होते. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि कामाचा वेग यासाठी ओळखले जाणारे अजितदादा पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर प्रशासनावर भक्कम पकड असलेले अनुभवी आणि कणखर नेतृत्व होते.
त्यांची राजकीय कारकीर्द ही संघर्ष, चिकाटी आणि सातत्यपूर्ण कार्याची साक्ष देणारी होती. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच जलसंपदा मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे व दूरगामी निर्णय घेतले. विशेषतः सिंचन, पाणीपुरवठा, शेती आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.
अजितदादा पवार यांची कार्यपद्धती थेट, स्पष्ट आणि परिणामकारक होती. काम वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण झाले पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका अनेक अधिकारी, सहकारी व कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरली. त्यामुळेच ते काम करणारा नेता म्हणून सर्वदूर ओळखले जात होते.
आमदार अमोल खताळ यांचे स्व. अजितदादा पवार हे राजकीय गुरु, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना, विशेषतः अमोल खताळ यांनी राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असताना, स्व. अजितदादा पवार यांचे त्यांना मोलाचे व दिशादर्शक मार्गदर्शन लाभले. त्या काळात दादांचा त्यांच्याशी निकटचा व सातत्यपूर्ण संपर्क होता.
त्या मार्गदर्शनातून मिळालेले राजकीय शिस्तीचे संस्कार, संघटन कौशल्य आणि निर्णयक्षमतेची दृष्टी हीच आज आमदार अमोल खताळ यांच्या सार्वजनिक जीवनाची भक्कम पायाभरणी ठरली आहे. योग्य वेळी योग्य दिशा देणे, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणे आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, ही स्व. अजितदादा पवार यांची वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्वशैली होती.

ग्रामीण महाराष्ट्र, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका कायम ठाम व स्पष्ट राहिली. राजकीय मतभेद असले तरी त्यांच्या प्रशासनिक क्षमतेचा व कार्यशैलीचा आदर सर्वच पक्षांमध्ये केला जात होता.
स्व. अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी नेता, कणखर प्रशासक आणि असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान गमावले आहे. मात्र त्यांनी दिलेले विचार, संस्कार आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास हे कायम स्मरणात राहतील. त्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.
