संगमनेर:
ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने, संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. स्वर्गीय कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले असून, त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण तालुका सरसावला असल्याचे आमदार तांबे यांनी आवर्जून नमूद केले.

हा ऐतिहासिक सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे, नूर मोहम्मद शेख आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्याला तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सांस्कृतिक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रघुवीर खेडकर गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
