अहिल्यानगर:
जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात अखेर मोठ्या खांदेपालटाला सुरुवात झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी बदल्यांचे पहिले आदेश निर्गमित केले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागा आणि दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या नव्या आदेशानुसार, आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांची साईमंदिर सुरक्षा कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांची वर्णी लागली आहे. तसेच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची राहुरी येथे बदली झाली असून, संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडे आता सोनई पोलीस ठाण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलात झालेल्या या अचानक बदलांमुळे इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः ज्या अधिकाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नाही किंवा ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत, अशांना नियंत्रण कक्षात पाठवण्याची तयारी प्रशासनाने केल्याचे समजते.
बदली रोखण्यासाठी सध्या अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असली, तरी आस्थापना मंडळाचा निर्णय अंतिम ठरणार आहे. लवकरच बदल्यांचा दुसरा टप्पा जाहीर होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता पुढील आदेशाकडे लागले आहे.
