संगमनेर:
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण योजनांमुळे संगमनेर तालुक्यावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक योजना केवळ कागदोपत्री पूर्ण दिसत असून प्रत्यक्षात मात्र त्या कार्यान्वित नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करण्याची पूर्वतयारी ठेवावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत.
तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात नुकतीच एक विशेष नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार खताळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.


यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत विशेषतः सायखिंडी आणि पठार भागातील पाणी प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. या भागातील अनेक वाड्या-वस्त्यांना अद्याप शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध झालेला नाही, तर काही दुर्गम भागात योजना पोहोचलेल्याच नसल्याचे निदर्शनास आले आहे.
आमदार खताळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कागदोपत्री योजना पूर्ण दाखवूनही जर प्रत्यक्षात जनतेची तहान भागत नसेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सुनावले. गेल्या वर्षी तालुक्यात २१ टँकर सुरू होते, मात्र यंदा जलजीवनच्या अपूर्ण कामांमुळे टँकरची मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात टंचाई जाणवेल, तिथे कोणत्याही प्रशासकीय दिरंगाईविना तातडीने पाहणी करून टँकर मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागणे हे प्रशासनाचे अपयश ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
टंचाईच्या काळात तालुक्यातील कोणत्याही गावाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची तंबी बैठकीत देण्यात आली. पाणीपुरवठा योजनांमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून टँकरचे प्रस्ताव विनाविलंब सादर करण्याचे आदेश आमदार खताळ यांनी दिले आहेत. पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून तो अबाधित राखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.
