Sat. May 30th, 2026

संगमनेर:

पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेना महायुतीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला असून, आमदार अमोल खताळ यांनी याप्रकरणी कडक भूमिका घेतली आहे.

कामगारांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि जर सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करून टोल नाका कायमचा बंद पाडू, असा सज्जड इशारा खताळ यांनी दिला आहे.

गेल्या नऊ-दहा वर्षांपासून इमानदारीने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे.आर.आर. रोडवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने कोणताही पूर्वविचार न करता कामावरून हटवले असून, काहींच्या पगारातही मोठी कपात केली आहे. या दडपशाहीविरोधात कामगारांनी पुकारलेल्या साखळी उपोषणाला आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.

यावेळी कामगार वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्यानंतर आमदार खताळ यांनी टोल व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना घटनास्थळावरूनच धारेवर धरत जाब विचारला.

या प्रकरणावर अंतिम मार्ग काढण्यासाठी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीचे मालक यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. नवीन कंपनी आली म्हणून जुन्या कामगारांना देशोधडीला लावणे कायद्याला धरून नसल्याचे सांगत, खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाच्या संचालकांना कडक सूचना दिल्या आहेत.

या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास महायुतीच्या वतीने तीव्र संघर्ष करण्याचा इशारा देण्यात आला असून, यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!