संगमनेर:
केंद्र सरकारने लागू केलेले नवीन चार लेबर कोड रद्द करावेत आणि ‘बी.व्ही.जी. रामजी’ योजना बंद करून पुन्हा ‘मनरेगा’ सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी संगमनेर येथे विविध संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. संगमनेर तालुका तंबाखू (जर्दा) कामगार युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने एकत्र येत उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनानुसार, केंद्र सरकारने २०२५ मध्ये आणलेले नवीन लेबर कोड पूर्णपणे कामगारविरोधी असून भांडवलदारांच्या हिताचे आहेत. या कायद्यांमुळे कामगारांनी दीर्घ संघर्षातून मिळवलेले २९ जुने कायदे मोडीत निघाले आहेत. नवीन तरतुदींमुळे किमान वेतन, बोनस, पेन्शन आणि ई.एस.आय. यांसारखे मूलभूत हक्क धोक्यात आले आहेत. कायमस्वरूपी रोजगाराऐवजी कंत्राटी पद्धत आणि १२ तासांच्या कामाच्या तरतुदीमुळे कामगारांचे शोषण वाढणार असल्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.


ग्रामीण भागातील मजुरांसाठी जीवनवाहिनी ठरलेली ‘मनरेगा’ योजना बंद करून त्याऐवजी आणलेली ‘बी.व्ही.जी. रामजी’ योजना मजुरांचा रोजगाराचा अधिकार हिरावून घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यासोबतच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून जनसुरक्षा विधेयक हे केवळ नावापुरतेच असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या निवेदनावर कॉ. माधव नेहे, कॉ. ॲड. ज्ञानदेव सहाणे, कॉ. प्रताप सहाणे, कॉ. भिका वाघ, कॉ. सयाजी कानवडे आणि कॉ. नारायण मेमाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
