संगमनेर:
देशातील वाढती महागाई आणि गॅस टंचाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला.
युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी केंद्र सरकारवर कडक टीका करताना सांगितले की, गॅसचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक होत आहे.


या आंदोलनात तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनीही सरकारवर हल्लाबोल करत, ही दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. सध्याच्या गॅस टंचाईमुळे गृहिणींसह विद्यार्थी आणि खानावळींचेही मोठे हाल होत असल्याचे यावेळी मांडण्यात आले.
आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी विविध पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन याबाबतचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
