Sat. May 30th, 2026

संगमनेर, प्रतिनिधी-

संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रंगारगल्ली परिसरात सध्या यातनांचा अनुभव नागरिकांना येत आहे. येथील शनिमंदिरासमोर सुरू असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम गेल्या १५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असून, नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक रहिवासी, शालेय विद्यार्थी आणि भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून दुसऱ्या कामाकडे लक्ष वळवल्याने हा परिसर सध्या अपघाताचा स्पॉट बनला आहे.

रंगारगल्ली हा भाग शहरातील धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या परिसरात शनिमंदिर, स्वामी समर्थ मंदिर, साईबाबा मंदिर, संतोषी माता मंदिर आणि गंगामाई मंदिर अशी मोठी देवस्थाने आहेत. प्रवरा नदी तीराकडे जाण्यासाठी देखील हा मुख्य मार्ग असल्याने येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, एसटीपीच्या कामासाठी रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आल्याने भाविकांना चिखल आणि खड्ड्यातून वाट काढत जावे लागत आहे. खोदाईनंतर परिसरात पसरलेली खडी आणि साचलेला चिखल यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून, परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

या गंभीर समस्येमुळे दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या आणि वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी केवळ नावापुरते बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, परंतु प्रत्यक्ष काम बंद असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. चिखलामुळे घसरून अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, रात्रीच्या वेळी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे. “स्वच्छ आणि सुंदर संगमनेर” असा गाजावाजा करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला आपल्याच हद्दीतील या महत्त्वाच्या कामाचा विसर पडला आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

या प्रश्नी युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सामान्य जनतेला वेठीस धरले जात असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे अर्धवट काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि रस्ता पूर्ववत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर हालचाल केली नाही, तर भविष्यात होणाऱ्या अपघाताला नगरपरिषदच जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!