संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील देवगिरे वस्तीवरील ५० वर्षीय शेतकरी पाराजी धोंडीबा देवगिरे यांचा रविवारी सकाळी शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. बोराटे वस्ती परिसरातील आपल्या शेतात नवीनच उभारलेल्या शेततळ्यावर कामासाठी गेले असताना ही हृदयद्रावक घटना घडली.
बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह शेततळ्यातील पाण्यात तरंगताना आढळला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरला पाठवला. कष्टाळू शेतकऱ्याच्या अशा अचानक जाण्याने साकूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून देवगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


