संगमनेर:
तालुक्यातील वडगाव पान येथे एका शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, संगमनेरच्या मुस्लिम समाजाने रमजान ईदच्या निमित्ताने माणुसकीची एक नवी मिसाल सादर केली आहे. सणाचा आनंद साजरा करण्याऐवजी या समाजातील बांधवांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबाला धीर दिला आणि मदतीचा हात पुढे केला.
या घटनेमुळे पीडित कुटुंब सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना पाठबळ देण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मुस्लिम मान्यवर, माजी व विद्यमान नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडितेच्या निवासस्थानी धाव घेतली. केवळ सांत्वन करण्यावरच न थांबता, मुस्लिम समाजाच्या वतीने या कुटुंबाला मोठी आर्थिक मदत देखील सुपूर्द करण्यात आली. या कठीण काळात तुम्ही एकटे नसून संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रतिनिधींनी संताप व्यक्त करताना सांगितले की, एका निष्पाप मुलीवर झालेला हा हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पीडित मुलीला न्याय मिळवून देणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, जखमी मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.


