Sat. May 30th, 2026

संगमनेर | प्रतिनिधी

सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातून अजिंक्य दामोदर मालुंजकर याची संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

एप्रिल २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात अकोले तालुक्यातील खानापूर शिवार परिसरात ही घटना घडल्याचा आरोप होता. पीडित मुलगी आजीसोबत शेतात चारा आणण्यासाठी गेली असताना, आरोपीने लॉकडाऊनचे कारण पुढे करून तिला मोटारसायकलवरून निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे लज्जास्पद वर्तन केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. गेली सहा वर्षे हा खटला संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सात साक्षीदार तपासले, परंतु पुराव्यांमध्ये मोठी तफावत दिसून आली.

आरोपीचे वकील ॲड. निखिल वाकचौरे यांनी प्रबळ युक्तिवाद करत आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा दावा केला. विशेषतः, तहसीलदारांसमोर झालेली ओळख परेड कायदेशीर नियमांचे पालन करून झालेली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी पुराव्याअभावी अजिंक्य दामोदर मालुंजकर याची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपीच्या वतीने मुख्य वकील म्हणून ॲड. निखिल वाकचौरे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. महेश जेजुरकर आणि ॲड. कावेरी जाधव यांनी कायदेशीर सहकार्य केले. या निकालामुळे आरोपीला मोठा दिलासा मिळाला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!