संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील एका दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे रविवारी थेट लोणी येथील रुग्णालयात येत आहे.
पीडित मुलगी सध्या लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत असून, मंत्री तटकरे तिथे जाऊन तिची विचारपूस करणार आहेत. या भेटीदरम्यान त्या पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी शनिवारी नियोजित असलेला हा दौरा तांत्रिक कारणांमुळे रद्द झाला होता, मात्र प्रकरणाचे गांभीर्य आणि पीडितेचे मानसिक बळ वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी लगेच रविवारी दौऱ्याची आखणी केली आहे.
मंत्री तटकरे रविवारी सकाळी सुतारवाडी (रोहा) येथून वाहनाने प्रवास करत सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत लोणी येथे पोहोचणार आहेत. पीडितेची भेट घेतल्यानंतर त्या संगमनेर मार्गे पुणे येथे रवाना होणार आहेत. केवळ एका पीडितेच्या भेटीसाठी मंत्री स्वतः विशेष दौरा करत असल्याने प्रशासकीय वर्तुळात या भेटीची मोठी चर्चा आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री तटकरे यांच्या या भेटीमुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळणार असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


