संगमनेर :
भारत ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची अन् साधुसंतांच्या संस्कारांची भूमी आहे. देश आणि धर्म टिकला तरच प्रगती साधता येईल, यासाठी प्रत्येकाने हिंदू धर्माचा व वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कीर्तनरूपी पुष्प सुनील महाराज पवार यांनी गुंफले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते.
यावेळी संगमनेर खुर्दचे माजी सरपंच भाऊसाहेब गुंजाळ, उपसरपंच गुलाब शेख, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ, संकेत खुंळे, सचिन पावबाके, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे विकास जाधव, गौरव आरणे, दिपक आव्हाड, अजित बलसाने, प्रसाद आव्हाड, सौरभ आरणे, पंढरी बलसाने, गोरख बलसाने, ऋषिकेश बलसाने, अभिषेक बलसाने, राजू आव्हाड आणि विलास आव्हाड यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, अखंड हरिनाम सप्ताहातून अध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि साधुसंतांच्या विचारांना उजाळा मिळतो. सप्ताह समितीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या युवकांना सहभागी करून सर्व घटकांना एकत्र आणले, हे कौतुकास्पद आहे. मी वारकरी संप्रदायातील कुटुंबातून आलो असून माझी आई देखील वारीला जात असते. जनतेच्या आशीर्वादाने मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून, या संधीचे सोने करून विकासकामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे.
संगमनेर तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून, महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
दरम्यान, संगमनेर खुर्द येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळातर्फे आमदार अमोल खताळ आणि कीर्तनकार सुनील महाराज पवार यांचा क्रेनच्या साह्याने हार घालून सन्मान करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या स्वागताने भाविक भारावून गेले होते.


