संगमनेर
संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश करणे आवश्यक असून, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा तीव्रतेने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
सावरगाव घुले येथील यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी महाआरती केली. याप्रसंगी बैलगाडा शर्यतीत यश मिळविल्याबद्दल मधुकर घुले यांचा आमदार खताळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सिताराम घुले, सचिव गोरक्षनाथ मदने, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुले, उपसरपंच नामदेव घुले, व्यापारी अमित राठी, सोसायटीचे अध्यक्ष संतोष घुले, भानुदास बोराडे, पत्रकार बाबासाहेब कडू, शरद घुले, सचिन घुले, बाळासाहेब घुले आणि बन्सी मदने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, वन विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता, मात्र आता त्या दूर करून देवस्थानाला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अकलापूर आणि सावरगाव घुले भागात बैलगाडा शर्यतीची परंपरा जतन केली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच, गाव ‘टँकरमुक्त’ झाल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. राजस्थानच्या धर्तीवर संगमनेर तालुक्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांचा नियोजनबद्ध विकास केल्यास पर्यटनवृद्धी होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

