शिर्डी:
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. पीडितेच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाल्या, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीडितेच्या कुटुंबाला ‘मनोधैर्य’ योजनेतून एक लाख रुपयांची मदत दिली जाणार असून ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम’अंतर्गत तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस युद्धपातळीवर तपास करत असून, पीडितेच्या समुपदेशनासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत.
या भेटीच्या वेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्यासह पीडितेचे कुटुंबीय उपस्थित होते.


