संगमनेर:
येथील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने डॉक्टरांवर गंभीर आरोप करत संगमनेर शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे आधीच एका गुन्ह्यात अडकलेल्या संबंधित डॉक्टरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
रोहीदास गणपत डोंगरे (रा. निमज, संगमनेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी मिना डोंगरे यांना छातीचा त्रास होऊ लागल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असताना तातडीने एन्जिओग्राफी करण्यात आली आणि त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ८० टक्के ब्लॉकेज असल्याचे सांगून एन्जिओप्लास्टी करण्यात आली. मात्र या शस्त्रक्रियेनंतर मिना डोंगरे यांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच खालावत गेली. त्यांना सतत चक्कर आणि उलट्यांचा त्रास होत असतानाही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
या घटनेदरम्यान हॉस्पिटल प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटकाही रुग्णाला बसल्याचे तक्रारीत नमूद आहे. ३० जानेवारी रोजी एम.आर.आय. करण्याची गरज असताना दुपारपर्यंत हॉस्पिटलने कोणतीही हालचाल केली नाही. अखेर नातेवाईकांनी स्वतः खासगी रुग्णवाहिका बोलावून एम.आर.आय. करून घेतला. या विलंबाने रुग्णाची अवस्था अधिक गंभीर झाली. तसेच आयसीयूमध्येही स्वच्छतेचा अभाव होता आणि स्टाफने रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा संतापजनक अनुभव नातेवाईकांनी मांडला आहे.
मिना डोंगरे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ३० जानेवारी रोजी नाशिक येथील सोपान हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या तपासणीत त्यांना न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये या आजाराकडे दुर्लक्ष करून भलतेच उपचार केल्याचा दावा डोंगरे यांनी केला आहे. दुर्दैवाने उपचारादरम्यान ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मिना डोंगरे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज जतन करावे, अशी मागणी रोहीदास डोंगरे यांनी केली आहे. या प्रकरणामुळे संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
