Sat. May 30th, 2026

संगमनेर:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात डीजेच्या आवाजावरून मंगळवारी मोठा राडा झाला. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर मात्र शंका व्यक्त होत आहे.

गेल्या चार दशकांपासून माघाडे परिवाराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वैचारिक व्याख्यानांची परंपरा जपली जाते. यंदा प्राध्यापक अहिरे यांचे व्याख्यान सुरू असतानाच समोरून महायुतीच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात डीजे लावून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे पडसाद आता महापुरुषांच्या उत्सवातही उमटू लागल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

व्याख्यानात वारंवार अडथळे येत असल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असताना असा गोंधळ घालणे ही संगमनेरची संस्कृती नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुमताई माघाडे यांनी थेट डीजे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन जाब विचारला असता, काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशीही उद्धट वर्तन केल्याचा आरोप झाला आहे.

पोलिस बंदोबस्त असतानाही राजकीय दबावापोटी प्रशासनाने या गोंधळाकडे दुर्लक्ष केल्याची टीका प्राध्यापक डॉ. शशिकांत माघाडे यांनी केली आहे. या प्रकारामुळे संगमनेरचा सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, प्रबोधन थांबवून डीजे लावणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता भीम सैनिकांनी आणि सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!