Fri. May 29th, 2026

संगमनेर:

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तल करणाऱ्या एका सराईत टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संगमनेरच्या जमजम कॉलनीतील तीन मुख्य आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’च्या कलम १११ अन्वये ‘संघटित गुन्हेगारी’चे कडक वाढीव कलम लावण्यात आले असून, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

नवीन कायद्यातील हे कलम मोक्का प्रमाणेच अत्यंत कडक असून, यामुळे परिसरात गो-तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या महिन्यात १४ एप्रिल २०२६ रोजी जमजम कॉलनीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून १५० किलो गोमांस, चाकू आणि वजन काट्यासह सुमारे २ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासात मुख्य आरोपी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद कुरेशी आणि नावेद जावेद कुरेशी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक संघटित टोळी बनवल्याचे उघड झाले. आरोपींचा गुन्हेगारी इतिहास पाहता मुख्य आरोपी नवाज याच्यावर १४, समदवर ११ आणि नावेदवर २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी एकत्र येऊन सातत्याने गुन्हे केल्यामुळे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, त्याला आता मंजुरी मिळाली आहे.

सध्या पोलिसांनी २८ वर्षीय आरोपी समद जावेद कुरेशी याला अटक केली असून, त्याचे इतर दोन साथीदार नवाज कुरेशी व नावेद कुरेशी हे फरार आहेत. फरार आरोपींची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!