संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अर्चना संदीप टेमगिरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली व त्यांना धीर दिला.
हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीजवळ शेतातून घरी परतत असताना ३० वर्षीय अर्चना टेमगिरे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि अर्चना टेमगिरे यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या भेटीदरम्यान, बिबट्यांचा मानवी वस्तीतील वाढलेला संचार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत डॉ. थोरात यांनी वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या डॉ. थोरात यांच्या या राजकारणाविरहित भेटीमुळे आपल्याला मोठे बळ मिळाल्याचे अर्चना टेमगिरे यांनी सांगितले. “माझ्या कुटुंबासाठी हे मोठे संकट होते, पण सर्वांच्या कृपार्शिवादाने मला जीवदान मिळाले आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या भेटीने मला बळ मिळाले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.