Sat. May 30th, 2026

संगमनेर: लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात सातत्याने उच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त, मंगळवार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता ‘जाणता राजा मैदान’ येथे ‘फोक आख्यान’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, सध्या महाराष्ट्राच्या तरुणाईत चर्चेत असलेला हा कार्यक्रम मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांनंतर तालुका पातळीवर प्रथमच होत आहे, अशी माहिती कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे.

एकविरा फाउंडेशन आणि ‘आय लव संगमनेर चळवळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य कार्यक्रमात, पारंपरिक लोकगीतांचा अनमोल खजिना नव्या, आकर्षक स्वरूपात सादर केला जाणार आहे. यात भारुड, गवळण, देवीचा जागर, खंडोबाची गाणी, महाराष्ट्राची लोककला, आदिवासी गाणी, जात्यावरची गाणी, पोवाडे, लावणी आणि स्फूर्तीदायी गीतांचा समावेश असेल.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात ७५ कलाकारांचा भव्य संच सहभागी होणार असून, अनेक मराठी चित्रपट आणि विविध मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती हे खास आकर्षण आहे. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. युवकांनी कार्यक्रमाच्या पास नोंदणीसाठी https://event.ekvirafoundation.com या साइटवर संपर्क साधावा.

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह एकविरा फाउंडेशन आणि ‘आय लव संगमनेर चळवळ’ यांच्यावतीने शहर व तालुक्यातील सर्व नागरिक, महिला व युवकांना या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!