संगमनेर –
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे. शनिवार पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एका तर नगरसेवक पदासाठी सात जणांची उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यामुळे 13 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्याकरिता अवघे काही तास उरले आहे. मात्र आज अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी अथवा महायुतीकडून कोणत्याही उमेदवारांचे अर्ज दाखल झाले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून कोणाची उमेदवारी जाहीर होते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या उमेदवारांचा अंदाज घेतला जात असला तरी महायुतीची मदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी शहर विकास अथवा अन्य आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढविण्याची चिन्ह आहे. त्यामुळे महायुतीने देखील आपले उमेदवार अद्याप जाहीर केले नाही.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज आता सोमवारी अखेरच्या क्षणी दाखल होण्याची चिन्हे आहे. उमेदवार यादी अंतिम झाली असली तरी फाटा फूट नको म्हणून मोठी दक्षता घेतली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीची नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेला आपल्याकडे घेण्यात यश आले आहे. यासोबत उपनगरातील जागा शिवसेना तर शहरातील जागा भारतीय जनता पक्ष लढविणार आहे. शहर आणि उपनगरात राष्ट्रवादीला एक-एक जागा सोडली जाणार असून मुस्लिम बहुल प्रभागामध्ये महायुतीकडून चिन्हावर निवडणूक न लढता अपक्ष उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
आत्तापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी केवळ एक तर नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. दरम्यान रविवारी दाखल झालेले 13 उमेदवारी अर्ज खालील प्रमाणे (कंसात प्रभाग)-
अश्विनी सतीश ढोले (प्रभाग 1 अ)
गोरे प्रसाद ज्ञानदेव (प्रभाग 7 ब)
शेख असिफ इलियास (प्रभाग 8 ब)
शेख सायरा इलियास (प्रभाग 9 ब)
कुरेशी हुरबानो गुलाम साबीर (प्रभाग 10 अ)
शेख फैरोजा इलियास (प्रभाग 10 अ)
शेख दिलशाद अजीज (प्रभाग 10 अ)
इनामदार एजाज जमील (प्रभाग 10 ब)
कुरेशी रशिदाबी अब्दुल करीम (प्रभाग 11 अ)
शेख शहबाज गफार (प्रभाग 11 ब)
सौदागर इम्रान सत्तार (प्रभाग 15 अ)
मोमीन जैद जुनेद (प्रभाग 15 अ)
शेख दिलशाद अजीज (प्रभाग क्रमांक 15 ब)
