संगमनेर: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांना प्रशासनाकडून जागा नाकारल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. समितीने नवीन नगर रोड येथील मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली होती, परंतु प्रशासनाने नकार दिला.
विशेष म्हणजे, महायुतीकडून २७, २८ नोव्हेंबरसह पुढील काही तारखा जाणीवपूर्वक सभा होऊ शकणारी मैदाने ‘ब्लॉक’ केल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. २८ नोव्हेंबरला महायुतीची कोणतीही सभा नसतानाही ती जागा रोखून ठेवण्यात आल्याने, संगमनेर सेवा समितीला मैदान मिळू नये हाच प्रशासनाचा हेतू स्पष्ट दिसत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
सेवा समितीने प्रशासनाला विनंती केली होती की, २८ तारखेला जागा रिकामी असल्यास सभेची परवानगी द्यावी. मात्र, प्रशासनाने महायुतीकडून जागा मिळणार नसल्याचे कारण पुढे केले. या घडामोडींमुळे प्रशासनावर प्रचंड राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होत असून, निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष रितीने पार पडण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जागा मुद्दाम रोखून निवडणूक वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याची नाराजी शहरात व्यक्त होत आहे.
सेवा समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांनी सडकून टीका केली. संगमनेर सेवा समितीला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सभेची जागा अडवून जनता थांबेल असे त्यांना वाटत असेल, पण जनतेच्या मनात असलेली आमची जागा कुणीही अडवू शकत नाही, असे पवार म्हणाले. संगमनेरमध्ये अशा प्रकारची राजकीय दडपशाही यापूर्वी कधीच नव्हती आणि याला जनता योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, सेवा समितीने इतर मैदानांची मागणी करूनही प्रशासनाने त्यावर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र शंका उपस्थित होत आहेत.
