संगमनेर –
संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाची निवडणूक केवळ दोन प्रमुख आमदारांच्या घराण्यांमधील लढत राहिली नसून, अपक्ष उमेदवारांनी यात मोठे आव्हान उभे केल्यामुळे विजयाचे गणित पूर्णपणे बदलले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, आता ‘विजयाची चावी अपक्षांच्याच हाती’ असेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
डॉ. मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती) यांनी या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी या नात्याने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्या शहरातील प्रत्येक वॉर्डात जातीने लक्ष घालत असून, त्यांची फिरस्ती आणि बैठकांचा धडाका सुरू आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि बाळासाहेब थोरात समर्थकांचे जाळे त्यांना मदत करत असल्याचे दिसून येते. याशिवाय माजी नगराध्यक्ष दुर्गाताई व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे सासू-सासरे देखील त्यांच्या परीने सुनेसाठी किल्ला लढवत आहे. पती आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील मैदानात उतरले आहे. संगमनेर सेवा समिती या नावाखाली त्यांनी शहरातील मूलभूत प्रश्न आणि विकासकामांवर भर दिला आहे.
दुसरीकडे, आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ (महायुती) यांनीही प्रचारामध्ये मुसंडी मारली आहे. त्यांना भाजप-शिवसेना-इतर घटक पक्षांच्या महायुतीचा पाठिंबा लाभला आहे. प्रचाराला मोठी धार देण्यासाठी दीर आमदार अमोल खताळ स्वतः मैदानात उतरून प्रचार करत आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये येऊन गेले. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संगमनेरमध्ये एमआयडीसी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वाढीव जागा, बहु चर्चित नाशिक पुणे रेल्वे मार्गाला संगमनेर मधून प्राधान्य आदी महत्त्वपूर्ण आश्वासने दिले आहे.
उपमुख्यमंत्र्यांची ही आश्वासने संगमनेरकर मतदार किती गांभीर्याने घेतात हे निवडणूक निकालातून समजणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, सत्ताधारी पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न खताळ गटाकडून केला जात आहे. खताळ यांच्या उमेदवारीसाठी आमदार खताळ यांनी आपले प्रतिष्ठा कोणाला लावल्याने आता त्यांच्या विजयासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र महायुतीतील मतभेद सध्यातरी दूर करण्यात ते फारसे यशस्वी झाल्याचे दिसत नाही.
अपक्षांचा ‘फॅक्टर’: मत विभाजनाचा धोका – या प्रमुख लढाईत ग्राउंडवर उतरलेल्या अपक्ष उमेदवारांनी दोन्ही प्रमुख उमेदवारांची समीकरणे बिघडवली आहेत. प्रमुख पक्षाच्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त तब्बल सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकूण आठ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आपले नशीब आजमावत आहे. अपक्षांचे मत विभाजन कोणाला तारते आणि कोणाचे गणित बिघडवते हे निवडणूक निकालातून समोर येईल.
अनुभवी माजी नगरसेविका असलेल्या सुषमा तवरेज यांनी पूर्वी काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. त्यांच्यासोबत समाजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांचे महिलांचे एक मोठे संघटन शहरात कार्यरत आहे. पूर्वी नगरसेवक असल्यामुळे त्यांना शहरातील प्रश्नांची सखोल जाण आहे. त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे त्या मोठ्या प्रमाणात मते खेचण्याची शक्यता आहे, यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडून त्याचा फटका तांबे गटाला बसू शकतो.
तर भाजपच्या माजी नगरसेविका असलेल्या मेघा भगत या कट्टर भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मागील निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी अनेक कामे केली आहेत, यामुळे त्यांचा जनसंपर्क मजबूत आहे. त्यांना पडणारी मते प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांची असणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या मतांचे विभाजन निश्चित असून, याचा थेट आणि मोठा तोटा सुवर्णा खताळ यांच्या उमेदवारीला होणार हे स्पष्ट आहे.
मुस्लिम महिलांची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या बानोबी शेख यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुस्लिम समाजातील महिलांसाठी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्यामागे महिलांची एक भक्कम व्होट बँक उभी आहे. यामुळे मुस्लिम समाजातील मतांचे निश्चितपणे विभाजन होणार आहे. हे विभाजन कोणत्या प्रमुख उमेदवारासाठी फायद्याचे ठरते, यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. याशिवाय मुस्लिम समाजातील आणखी काही महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्याने तेथे देखील मत विभाजन होण्याचे शक्यता आहे.
एकंदरीत, संगमनेर नगरपरिषदेची ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. दोन्ही प्रमुख गटांनी आपले सर्वस्व पणाला लावले असले तरी, विजयाची गणिते अपक्ष उमेदवारांच्या कामगिरीवर पूर्णपणे अवलंबून आहेत. अपक्षांमुळे होणारे मतविभाजन इतके मोठे आहे की, जे उमेदवार या मत विभाजनामध्ये आपले मूळ गट, हक्काचे मतदान टिकवून ठेवेल, तोच उमेदवार बाजी मारेल.
सध्या तरी, संगमनेरच्या मतदारांनी आपले पत्त्यांचे डाव उघड केलेले नाहीत. परंतु, या अपक्ष उमेदवारांच्या मतांमुळे ‘कांटे की टक्कर’ होऊन, अत्यंत कमी मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी होईल, असा राजकीय अंदाज आहे.
