महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सहकार महर्षी थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूमवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळेसाठी बंद पडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका अधिक गडद झाल्या असून, संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे.
नगरपालिका निवडणुकीतील सर्व ईव्हीएम मशीन या स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी येथे २४ तास सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जात असताना, आज (रविवार, ७ डिसेंबर) हे कॅमेरे काही काळासाठी बंद पडल्याची गंभीर बाब समोर आली.
ही माहिती मिळताच विविध पक्षांचे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. मात्र, कॅमेरे बंद पडण्याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला.
माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी या घटनेवर तीव्र टीका केली आहे. सत्ताधारी काहीही करू शकतात,”l असे म्हणत त्यांनी या प्रकरणामागे प्रशासनावर कोणताही दबाव तर नव्हता ना, अशी शंका व्यक्त केली.
दरम्यान, या गोंधळानंतर संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद गोरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकून खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क मेमरी भरल्याने ती बदलण्यात आली. त्यामुळे थोडा गैरसमज झाला. हार्ड डिस्क बदलतानाचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तरीही, प्रशासनाकडून अधिकृत आणि स्पष्ट खुलासा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
