Sat. May 30th, 2026

संगमनेर, प्रतिनिधी:

न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या उर्वरित तीन जागांसाठीचे (प्रभाग 1 ब, 2 ब, 15 ब) निवडणूक चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर लढतींचे स्वरूप निश्चित झाले असून, आता शनिवारी, 20 डिसेंबरला या जागांसाठी मतदान होणार आहे.

तीन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे लढती खालीलप्रमाणे निश्चित झाल्या आहेत:

प्रभाग 1 ब: येथे सरळ लढत होणार असून, संगमनेर सेवा समितीचे माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार अभिजीत पुंड यांच्यात लक्षवेधी ‘कांटे की टक्कर’ होणार आहे.

प्रभाग 2 ब: या महिला राखीव जागेवर चौरंगी लढत असून, दिघे अर्चना सुभाष (संगमनेर सेवा समिती), इंदिरा शशांक नामन (शिवसेना-शिंदे गट), म्हस्के सुवर्णा दत्तात्रेय (राष्ट्रवादी-अजित पवार गट) आणि अपक्ष सुजाता महेश ऐनगंदुल या रिंगणात आहेत.

प्रभाग 15 ब: येथे तिरंगी लढत होत असून, पठाण नसीमबानो इसहाकखान (संगमनेर सेवा समिती) यांची लढत अपक्ष पठाण जुलेखा निसारखान आणि शेख दिलशाद अजीज यांच्याशी होईल.

प्रतिष्ठा पणाला! तांबे विरुद्ध खताळ

या निवडणुकीत नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे (संगमनेर सेवा समिती) आणि आमदार अमोल खताळ (शिवसेना-भाजप) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालिका ताब्यात घेण्यासाठी दोन्ही आमदारांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, तूर्तास तांबे यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे.

2 डिसेंबरला 27 जागा आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर, आता या सर्व जागांचा अंतिम निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या दिवशी संगमनेर नगर परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते, हे स्पष्ट होईल.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!