Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर/नागपूर: संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांचा ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील ३ दिवसांत मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे तसेच वीरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची बदली केली जाणार असल्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे.

महसूल अभिलेखात ही जमीन मणियार कुटुंबाच्या मालकीची असली तरी, प्रत्यक्ष ताबा रहिवाशांकडे होता. आमदार तांबे यांनी थेट मणियार कुटुंबाशी संपर्क साधून रहिवाशांच्या नावे ‘कन्फरमेशन डीड’ करण्याची विनंती केली. कुटुंबाने याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रहिवाशांचे जमिनीचे उतारे आता एका दिवसात क्लिअर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यापूर्वी महसूल मंत्र्यांनी प्रत्यक्ष कब्जाधारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवण्याचा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने आमदार तांबे यांनी आज हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला व विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

महसूल मंत्र्यांनी या दिरंगाईची गंभीर दखल घेत, या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सब रजिस्ट्रारची बदली करण्याचे आणि कोणाच्या दबावाखाली हा हलगर्जीपणा झाला याची चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.

७०० हून अधिक नागरिकांच्या दस्त नोंदणीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी, महसूल मंत्र्यांनी पुढील ३ दिवसांसाठी विशेष कॅम्प लावण्याची आणि दुय्यम निबंधक कार्यालयाला अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्याची घोषणा केली आहे. तसेच, आयजीआर (IGR) स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी संगमनेरला उपस्थित राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदीर्घ काळानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याने इंदिरानगरच्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आमदार तांबे यांनी याबद्दल महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!