महासंगम न्यूज ऑनलाईन, संगमनेर –
संगमनेर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने आमदार अमोल खताळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. खताळ यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रसारित झालेले गांजा तस्कर असल्याचे व्हिडिओ ‘छेडछाड’ केलेले असल्याचा सनसनाटी दावा काँग्रेसने केला आहे.
या संदर्भात, यशोधन जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते बाबा ओहोळ, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि संबंधित युवक साईराज कांदळकर, सार्थक कांदळकर, आणि अक्षय दिघे उपस्थित होते. त्यांनी या ‘फेक’ व्हिडिओची पोलखोल केली.
नागपूर अधिवेशनादरम्यान आमदार खताळ यांच्या यंत्रणेमार्फत काही व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरवण्यात आले होते. यामध्ये जे युवक ‘गांजा तस्कर’ म्हणून दाखवले, ते तळेगाव दिघे येथील असून, त्यांनी नवीन ‘थार’ गाडी घेतल्यानंतर तिचे पूजन लोकनेते बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत केले होते. युवकांनी पूजनाच्या वेळचे मूळ व्हिडिओ सादर करत, खताळ यांच्या यंत्रणेने फिरवलेल्या व्हिडिओतील ‘तुषार पडवळ’ हा व्यक्ती प्रत्यक्षात सार्थक कांदळकर असल्याचे उघड केले.
या व्हिडिओमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल बोलताना सार्थक कांदळकर म्हणाले, माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी हा व्हिडिओ बाहेर आला. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी थेट मला, ‘तू गांजाचा व्यवसाय करतो की काय?’ असा प्रश्न विचारला. हे माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र आहे. यावर बाबा ओहोळ यांनी खताळ यांच्यावर टीका करत, खोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्याची बदनामी करणे थांबवावे, अन्यथा तालुक्यातून तीव्र उद्रेक होईल, असा इशारा दिला.
दरम्यान, सोशल मीडियावर झालेल्या बदनामीच्या विरोधात सर्व बाधित युवकांनी पोलीस तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, बाळासाहेब थोरात आणि संगमनेरच्या बदनामीचा राज्यातून निषेध होत असल्याचे मत बाबा ओहोळ यांनी व्यक्त केले आहे.
