महासंगम न्यूज ऑनलाईन | संगमनेर-
तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ले रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हायटेक यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या मोहिमेअंतर्गत वन विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ज्या भागात बिबट्यांची घनता अधिक आहे तिथे थर्मल ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे आणि ५०० हून अधिक ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय वन विभागाच्या ताफ्यात २२ नवीन गस्ती वाहने आणि ५ अत्याधुनिक गन दाखल होणार असून, ही विशेष मोहीम पुढील ४ ते ६ महिने प्रभावीपणे राबवली जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे असणे गरजेचे असल्याने, कालवे आणि वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमणे २२ जानेवारीपर्यंत हटवण्याचे कडक आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून हे रस्ते वाहतुकीयोग्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी पालकांनी रोटेशन पद्धतीने ट्रॅक्टर किंवा सुरक्षित वाहनांतून मुलांना शाळेत पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच, बिबट्यांच्या कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी गोरक्षनाथ गड परिसरात २०० ते २५० एकर जमिनीवर ‘रेस्क्यू सेंटर’ उभारण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.
यावेळी आमदार अमोल खताळ, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
