संगमनेर | महासंगम न्यूज ऑनलाईन
सहकारी क्षेत्रात आपला नावलौकिक जपणाऱ्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर्जप्रकरणे आणि कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा गैरवापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या व्यवस्थापकासह २२ संचालक मंडळाविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदारांच्या दाव्यानुसार, शेती व व्यापारासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून जमिनी व गृह तारण कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, मंजूर केलेली पूर्ण रक्कम कर्जदाराला न देता, त्यांच्याकडून कोऱ्या विड्रॉवल स्लिप्स आणि कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्या. कागदोपत्री कर्ज पूर्ण दिसले तरी प्रत्यक्षात मात्र उर्वरित रक्कम संगनमताने लाटण्यात आली.
कर्ज मंजुरीसाठी जमिनीचे बाजारमूल्य वाढवून दाखवणे, आतल्या भागातील जमिनी रस्त्यालगत असल्याचे भासवणे आणि खोट्या चतु:सीमा नमूद करून बनावट गहाणखते तयार करण्याचे गंभीर प्रकार या पतसंस्थेत घडल्याचा आरोप आहे. ही रक्कम संचालक व त्यांच्या निकटवर्तीयांनी वापरल्याचा दावा १४ तक्रारदारांनी केला आहे.
यांनी घेतली न्यायालयाची धाव – कल्पेश फुलचंद गांधी, बाळासाहेब सहादु हाडवळे, नंदू सुभाष वर्पे, सूर्यभान शेटे, नंदू कारभारी खेमनार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, जिजाबापु पोपट शिंगोटे, नामदेव गोविंद आहेर, सुधाकर बाजीराव जाधव, रंगनाथ किसन सानप, अमोल दादासाहेब गुंजाळ, संतोष संपत सातपुते, राजेंद्र अण्णा खेमनर, प्रकाश भाऊसाहेब जोंधळे.
यांच्या विरोधात तक्रार – व्यवस्थापक गजानन चिमण ठाकरे यांच्यासह पुढील संचालकांवर तक्रार दाखल झाली आहे- राजकुमार रतिलाल गांधी, नंदनमल बंडुलाल बाफना, सुमतीलाल उत्तमचंद भंडारी, कांतीलाल आनंदराम गांधी, आनंद मोहनलाल दरडा, सचिन सुमतीलाल धाडीवाल, छाया प्रफुल्लकुमार बोगावत, सुनिता धर्मेंद्र पिपाडा, अशोक भागुजी नारायणे, प्रितेश चंद्रकांत पारख, महेश केशरचंद पितळे, वैभव रमेश ढोरे, दिलीप दिगंबर मैड, अभिजित रमेश भावसार, रामकृष्ण नामदेव भागवत, बाळासाहेब दत्तात्रय मुर्तडक, रमेश लक्ष्मण बुळकुंडे, प्रतिभा भाऊसाहेब गडाख, कविता दादासाहेब दिघे, श्रीमती राजश्री विजय कुऱ्हे आणि कांतीलाल अमरचंद धाडीवाल.
पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने थेट कोर्टात धाव – हा घोटाळा पूर्वनियोजित कट असून पोलीस ठाण्यातून दाद न मिळाल्याने अखेर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १७५ (३) नुसार न्यायालयात दाद मागितली आहे. पुणे येथील ‘एपीजे लीगल’चे ॲड. प्रसन्नकुमार मनोहर जोशी आणि ॲड. प्रथमेश किरण गांधी फिर्यादींची बाजू मांडत आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा किंवा सीआयडीकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालय या प्रकरणी काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
