महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वबळावर ताकदीने लढणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संगमनेर व फॉरेस्ट वाहतूकदार संघटना, किसानसभा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.२५ डिसेंबर) सकाळी ११ वाजता अकोले नाक्यावरील लालतारा कार्यालयामध्ये विविध विषयांवर विचार-विनिमय करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. बापू कानवडे होते. अध्यक्षीय सूचना कॉ. भिका वाघ यांनी मांडली तर कॉ. प्रताप सहाणे यांनी अनुमोदन दिले. यावेळी सयाजी कानवडे, ॲड. ज्ञानदेव सहाणे, नारायण मेमाणे सर, लक्ष्मण रोडे, किसनराव गंभीरे, पोपट चौधरी, कॉ. दशरथ हासे, कॉ. रघुनाथ पवार, रजत अवसक, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध गावांमधून ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी तालुक्यातील त्यांच्या गावांमधील प्रश्न, समस्या मांडल्या असून ६ जानेवारी रोजी प्रांताधिकारी संगमनेर यांना या सर्व विषयावर निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीत फॉरेस्ट वाहुतदार पीक पहाणी, फॉरेस्ट वाहूतदार उतारा नोंदी, कर्ज प्रकरणे, जिल्हा व पंचायत समिती निवडणूक, पेसा व डार्क झोन यासोबत अन्य विषयांवर सकारात्मक चर्चा करून निवेदने देण्याचे ठरले असून वेळ पडल्यावर रस्त्यावर उतरून लढा देण्याचेही ठरले आहे.
पक्षाकडून सर्व ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणात उमेदवारी- अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहे. चंदनापुरी जिल्हा परिषद गटातून भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष, शिवआर्मी शेतकरी संघटनेचे संस्थापक दत्ता ढगे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना समविचारी पक्ष आणि संघटना पूर्णपणे समर्थन देऊन याठिकाणी कोणतीही उमेदवारी देणार नाहीत. पक्ष संघटनेत विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला यांसह विविध यशस्वी लढे दिले असून अनेकदा मोर्चे काढले असून वेळप्रसंगी तुरुंगवास सुद्धा जनतेच्या प्रश्नावर सोसला आहे.
उद्या (२६ डिसेंबर) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्ष महोत्सव साजरा होत आहे, त्यानिमित्ताने संगमनेर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते अहिल्यानगर येथे शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
