Sat. May 30th, 2026

मुंबई: संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती आणि नागरिकांचा जीव जात असल्याच्या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संगमनेरमधील बिबट्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली.

मंत्रालयातील दालनात झालेल्या सविस्तर चर्चेत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कृषी आणि दुग्ध व्यवसायात प्रगत आहे. पशुपालनामुळे शेतकरी आणि महिलांचा चारा काढण्यासाठी शेतात सतत वावर असतो, मात्र वाढत्या हल्ल्यांमुळे सध्या ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात सिद्धेश कडलग या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असल्याचे नमूद करत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वनमंत्र्यांकडे मागणी करताना प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर ‘प्रकाश योजना’ कार्यान्वित करणे, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने ‘विशेष टास्क फोर्स’ स्थापन करून ठोस कारवाई करणे आणि वन अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी सतत संवाद साधून त्यांच्यात सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. तसेच, बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना विनाविलंब शासकीय मदत मिळवून देण्याची आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.

या निवेदनाची गंभीर दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठकीतूनच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले. मानवी जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता असून वनविभागाने तातडीने याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी बोलताना नाईक यांनी आवर्जून सांगितले की, सिद्धेश कडलग याच्या मृत्यूनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही तातडीने फोन करून या प्रश्नावर सूचना दिल्या होत्या. या बैठकीत वन विभागासह पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण आरोग्य या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!