Sat. May 30th, 2026

संगमनेर:

संगमनेर तालुक्यात विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय कलगीतुरा रंगला असून काँग्रेसने सत्ताधारी विखे-खताळ गटावर ‘क्रेडिट चोरी’चा गंभीर आरोप केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कष्ट उपसून मंजूर करून आणलेल्या कामांवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ आपली पाटी लावून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याची टीका तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी केली आहे.

अजय फटांगरे यांनी पुराव्यांसह सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मालदाड येथील ज्या १७ कोटींच्या रस्त्याचे उद्घाटन झाले, तो रस्ता मुळात ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’तून १९ कोटींचा मंजूर झाला होता. विशेष म्हणजे, ६ मार्च २०२३ रोजी या कामाला मंजुरी मिळाली तेव्हा अमोल खताळ आमदारही नव्हते.

ज्यांना कामाची योजना आणि खरी किंमतही माहित नाही, त्यांनी श्रेयासाठी अशी ‘नौटंकी’ करणे हास्यास्पद असल्याचे फटांगरे यांनी म्हटले आहे. पिंपरणे ते कोळवाडे शिरापूर हा रस्ता थोरातांच्या प्रयत्नातून आधीच पूर्ण झालेला असताना, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याचे पुन्हा उद्घाटन केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

शेंडेवाडी ते हिवरगाव पठार या रस्त्यासह अनेक छोटी कामे ही थोरातांच्या पाठपुराव्यामुळे किंवा ग्रामपंचायतींच्या निधीतून झाली आहेत. मात्र, वर्षभर सत्ता हाती असताना नवीन काहीही न करता आल्याने आता जुन्याच कामांच्या फिती कापून आमदार खताळ पालकमंत्र्यांचीही दिशाभूल करत आहेत का, असा सवाल फटांगरे यांनी उपस्थित केला आहे. संगमनेरची सुज्ञ जनता अशा निवडणुकीच्या स्टंटबाजीला बळी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या या वागण्याला ‘राजकीय दिवाळखोरी’ म्हटले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!