महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर
संकटाच्या वेळी डगमगून न जाता प्रसंगावधान राखून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या वीर बालकांचा गौरव करणे, ही समाजाची जबाबदारी आहे. याच भावनेतून ‘संगमनेर मेडिकल फाउंडेशन’ संचलित वामनराव इथापे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ‘वीर बाल दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मृत्यूच्या दाढेतून बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या कु. ओम सोमनाथ आहेर आणि कु. प्रज्वल संतोष उगले या दोन वीर बालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेचे प्राचार्य सुशांत आरोटे यांनी प्रास्ताविकात या दोन वीर मुलांच्या साहसाचा थरार उलगडला. एका शैक्षणिक सहलीदरम्यान पहाटेच्या वेळी बस चालकाला अचानक ग्लानी आली आणि तो बेशुद्ध पडला. बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अनर्थ घडणार इतक्यात ओम आहेर आणि प्रज्वल उगले या दोन विद्यार्थ्यांनी जिवाची पर्वा न करता बसचा ताबा मिळवला. त्यांच्या या धाडसामुळे बसमधील ३० ते ४० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या संकल्पनेतून हा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रदीप सोनवणे यांनी आपल्या भाषणात मुलांचे कौतुक करताना सांगितले की, असामान्य कामगिरी करणाऱ्या अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केल्यास भविष्यात त्यांच्याकडून देशसेवा घडण्यास मदत होईल. त्यांनी या मुलांच्या पालकांचेही विशेष अभिनंदन केले.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अशोकराव इथापे, कार्यकारी संचालक अनिकेत इथापे, विश्वस्त तेजस्विनी इथापे, प्राचार्य सुशांत आरोटे, वीर बालकांचे पालक सोमनाथ आहेर व संतोष उगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वर्पे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन खाडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार हांडे, सचिन खाडे, मयूर घुले, संजय रहाणे आणि अश्विन कानवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
