संगमनेर-
डॉ. बाबा आढाव यांची कष्टकरी वर्गाशी असलेली नाळ आणि त्यांनी उभ्या केलेल्या चळवळी गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सुभाष वारे यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सत्यशोधक विचार मंच’च्या वतीने व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. वारे यांनी ‘डॉ. बाबा आढाव – जीवन व कार्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
प्रा. वारे पुढे म्हणाले की, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, ‘कष्टाची भाकर’ आणि ‘एक गाव एक पाणवठा’ यांसारख्या चळवळी बाबांच्या कार्याचा कणा आहेत. शासनाकडून किंवा कोणत्याही संस्थांकडून आर्थिक मदत न घेता कष्टकरी वर्गाच्याच सहकार्यातून या योजना यशस्वी करणे, हे बाबांच्या खऱ्या नेतृत्वाचे प्रतीक आहे. हमाल पंचायत हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला असून, कष्टाची भाकर या प्रयोगातून हमालांच्या जेवणाची सोय झाली. मानवी कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील आव्हाने असली, तरी त्यातील ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ विचारवंत प्रा. मा. रा. लामखडे यांनी बाबा आढाव यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. तुरुंगात असताना बाबांनी कैद्यांना वाचून दाखवलेली पत्रे आणि त्यावर मिळणाऱ्या प्रतिक्रिया सांगून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. डॉ. बाबा आढाव यांची खरी ओळख ही ‘सत्यशोधक समाजवादी’ अशीच असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आणि सभागृहात राष्ट्र सेवा दलाचे राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षां रूपवते, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ अवसक, ॲड. रंजना गवांदे, जुबेरभाई इनामदार, ॲड.. समीर लामखडे, अजिजभाई ओहरा, दत्ता ढगे, अर्जुन वाळके, प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. जयसिंग सहाणे, इंजि. संपतराव देशमुख, इंजि. प्रशांत गायकवाड, प्रा. तुळशीराम जाधव, अरुण ताजणे, डॉ. सागर भालेराव, राम अरगडे, रजत अवसक, डॉ. सुरेश बालोडे, बंटी यादव, प्रमिला अभंग, विनोद गायकवाड, सोमनाथ मदने, सुखदेव इल्हे, श्रीनिवास पगडाल, प्रकाश कडलग, गायकवाड सर, भालेराव सर, अरविंद गाडेकर, डॉ. माणिक शेवाळे, मंजाबापू गुंजाळ, ॲड.. गोपीनाथ घुले, ॲड. संग्राम जोंधळे, जावेदभाई शेख, डॉ. यशवंत लांडगे, कैफ तांबोळी, मोहसीन शेख, प्रा. संजय शिंदे आणि उत्तम पाळंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हिरालाल पगडाल यांनी करून व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संदीप काकड यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
