संगमनेर:-
राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
आमदार थोरात यांनी म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या ही पिके उभारणीच्या अवस्थेत असून त्यांना युरिया खताची सर्वाधिक गरज आहे, मात्र बाजारपेठेत खत उपलब्ध नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजारात खरोखरच युरियाची कमतरता आहे की काही घटकांकडून जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, याची सखोल चौकशी सरकारने करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केवळ खत टंचाईच नव्हे, तर सरकारच्या इतर धोरणांवरही त्यांनी निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेले सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सत्तेत आल्यावर विसरले गेल्याचे चित्र आहे. तसेच अतिवृष्टीची प्रलंबित मदत आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून खताची पुरवठा साखळी सुरळीत करावी आणि प्रत्येक गावात आवश्यक साठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
