संगमनेर, प्रतिनिधी-
ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन आणि घरकुल यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी. कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, वेळप्रसंगी मी स्वतः ‘फिल्ड’वर उतरून कामाची गुणवत्ता तपासेल, असा कडक इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खताळ यांनी जलजीवन योजनेतील त्रुटींवरून प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींमध्ये तथ्य असून, प्रशासनाने पुढच्या एक महिन्यात कामांचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले.
तसेच सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांबाबत संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, केवळ सहा महिन्यांतच रस्त्यांवर खड्डे पडत असतील तर ती शासनाच्या प्रतिमेची हानी आहे, त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचवू नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेबाबत बोलताना त्यांनी संगमनेर तालुका मागे पडता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता टँकर व्यवस्थेचे नियोजन आत्तापासूनच करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. अधिकाऱ्यांनी जनतेशी सौजन्याने वागावे आणि कामात पारदर्शकता ठेवावी, असे आवाहन करत खताळ यांनी यापुढे दरमहा स्वतः कामांचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीस गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
