संगमनेर –
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून संगमनेर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनीही यावेळी आपला पदभार ग्रहण केला. या सोहळ्यानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर उत्साहात न्हाऊन निघाला होता.
पदभार स्वीकारण्यापूर्वी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रीयन फेटे परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, लालबहादूर शास्त्री, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचे आशीर्वाद घेतल्यानंतर ऐतिहासिक नगरपालिकेच्या प्रांगणात या लोकप्रतिनिधींचे आगमन झाले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवन येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली.
यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वच्छता, बंधुभाव आणि एकात्मता ही संगमनेरची संस्कृती असून १९९१ पासून नगरपालिकेने विकासाची एक आदर्श परंपरा जपली आहे. डॉ. सुधीर तांबे ते सौ. दुर्गाताई तांबे यांच्यापर्यंत सर्वांनीच नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा दिल्या असून, नवनिर्वाचित मंडळाने हाच वारसा अधिक आत्मविश्वासाने पुढे न्यावा. राज्यातील हा सर्वात मोठा विजय असून संगमनेरची जनता सुखी आणि आनंदी राहण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी प्रशासकीय पारदर्शकतेवर भर दिला. संगमनेर शहर देशात आदर्श बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असून पहिल्या १०० दिवसांचे काम आधीच सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी गणेश नगर व दिल्ली नाका परिसरात नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय उभारले जाणार असून, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, आता नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले घरपोच दिले जातील आणि शहरातील शास्तीकर माफी व घरांवरील आरक्षणे हटवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.
नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी आपल्या भाषणात ‘संगमनेर २.०’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “जनतेने दिलेला विश्वास हीच आमची ताकद असून शहरात उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी सेवा समितीची संपूर्ण टीम कटिबद्ध आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन संगमनेरच्या विकासाची नवी उंची गाठू.”
या सोहळ्याला जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, उद्योगपती राजेश मालपाणी, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह संगमनेर सेवा समितीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, अधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन सुविधा अरासिद्ध व शोभा हजारे यांनी केले, तर आभार प्रमिला अभंग यांनी मानले.
