Sat. May 30th, 2026

अकोले (प्रतिनिधी):

माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत आपण प्रचंड सकारात्मक व आशावादी असून, सध्या माध्यम क्षेत्रात मोठी रचना आणि व्यवस्थापन बदलत आहे. या बदलांमुळे काही आव्हाने नक्कीच निर्माण झाली आहेत, मात्र या बदलांतून संधी शोधणारा माणूस हा पत्रकारच असून तो उत्तम पद्धतीने या परिस्थितीशी जुळवून घेत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शीतल पवार यांनी अकोले येथे केले.

पत्रकार दिनानिमित्त अकोले नगर पंचायत व अकोले पत्रकार यांच्या वतीने शीतल पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पत्रकारांशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या की, सोशल मीडियावर मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे. वृत्तपत्रांमध्ये जागेची मर्यादा असल्याने आता या व्यक्त होणाऱ्या विचारांना डिजिटल मीडियावर मोठ्या प्रमाणावर जागा द्यावी लागणार आहे. आज प्रत्यक्ष वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणाऱ्यांची संख्या कमी वाटत असली, तरी ई-पेपर वाचणाऱ्यांची संख्या काही लाखांच्या घरात पोहोचली आहे, ही पत्रकारितेसाठी समाधानाची बाब आहे.

या बदलांच्या काळात पत्रकारांनी आता आपले लिखाण अधिक वेगळ्या आणि कल्पक पद्धतीने करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. विशेषतः ग्रामीण पत्रकारांच्या बाबतीत हा वेगळेपणा प्रकर्षाने दिसून येतो. आपण लोकांसाठी काय वेगळे देतो आणि आपले माध्यम त्यांच्यापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचवतो, याला भविष्यात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. हे बदल अत्यंत वेगाने होत असून, येत्या एक-दोन वर्षांत माध्यम क्षेत्राचे पूर्णतः बदललेले रूप आपल्याला अनुभवायला मिळेल, त्यामुळे पत्रकारांनी अधिकाधिक लोकाभिमुख होणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शीतल पवार यांनी धुळे सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला आणि पुण्यापर्यंत पोहोचलेला आपला पत्रकारितेचा प्रवास उलगडला. उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरदराव नवले, नगरसेवक विजय पवार, मुख्याधिकारी धनश्री पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, श्रीनिवास रेणूकदास, अमोल वैद्य, विद्याचंद्र सातपुते, राजेंद्र मालुंजकर, दिनेश जोरवर, आकाश भालेराव, प्रदीप कदम, संकेत आवारी, मनसे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, रणजित शिंदे व नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले, तर नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!