संगमनेर-
विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी संगमनेरचा दौरा केला. यावेळी त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही भेट केवळ ‘औपचारिक’ असल्याचे सांगण्यात आले असले, तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.
सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रा. राम शिंदे पुण्याहून कोपरगावकडे जात होते. यावेळी त्यांनी संगमनेर शासकीय विश्रामगृहावर काही काळ विश्रांती घेतली. या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदे यांनी उपस्थित निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी वैभव लांडगे, भरत फटांगरे, पायल ताजणे, ज्ञानेश्वर कर्पे, विठ्ठल शिंदे, काशिनाथ पावसे, राजेंद्र सांगळे, जालिंदर वाकचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रा. शिंदे यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी खताळ यांच्याशी आणि उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. महायुतीमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आल्याचे समजते.
सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या इंदिरानगर येथील निवासस्थानी झालेल्या भेटीची. राम शिंदे यांनी डॉ. तांबे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी संगमनेरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. सुमारे २० ते २५ मिनिटे चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्या. यावेळी जालिंदर वाकचौरे देखील उपस्थित होते.
विशेष म्हणजे, राम शिंदे यांच्या या दौऱ्याची माहिती भाजपच्या किंवा मित्रपक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना नव्हती. केवळ मोजक्याच कार्यकर्त्यांना याची पूर्वकल्पना होती. ही भेट पूर्णपणे सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय पटलावर या भेटीचे नेमके कारण काय, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर प्रा. राम शिंदे थेट कोपरगावकडे रवाना झाले.
