Sat. May 30th, 2026

संगमनेर-

तालुक्यात तब्बल चार दशकांहून अधिक काळ सत्तेचा उपभोग घेतल्यानंतरही जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आलेल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी आता ‘दहशत’ आणि ‘गुंडगिरी’चा बागुलबुवा उभा केला जात आहे. सत्तेत असताना मौन बाळगणारे नेते सत्ता जाताच भीतीचे राजकारण करत असल्याची टीका शिवसेना (युवासेना) तालुका अध्यक्ष सुशील शेवाळे यांनी केली आहे.

सुशील शेवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांकडून जाहीर मेळाव्यांमधून ‘गुंडगिरी’, ‘दहशत’ आणि ‘बेकायदेशीर टोलनाके’ यांसारख्या शब्दांचा वापर केला जात आहे. मात्र, जेव्हा ४० वर्षे सर्व सत्ताकेंद्रे, पोलीस यंत्रणा आणि प्रशासन तुमच्या हातात होते, तेव्हा ही परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी तुमची नव्हती काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ता असताना सर्व काही सुरळीत आणि सत्ता गेल्यावर अचानक परिस्थिती बिघडल्याचा आव आणणे, हा जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

संगमनेर तालुक्याने एकाच नेतृत्वावर दीर्घकाळ विश्वास टाकला, मात्र या काळात तालुक्यात मोठे औद्योगिक प्रकल्प का आले नाहीत? तरुणांसाठी स्थायी रोजगार का निर्माण झाला नाही? आणि आरोग्य व शिक्षण व्यवस्था दर्जेदार का झाली नाही? या वस्तुस्थितीवर बोलण्याऐवजी आता केवळ भावनिक राजकारण केले जात आहे. ४० वर्षांच्या सत्तेचा हिशोब देण्याऐवजी भीतीचे वातावरण निर्माण करून पराभवाचे खापर फोडण्याचे काम सुरू असल्याची टीका शेवाळे यांनी केली.

विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यात विकासाचा नवा दृष्टिकोन समोर आला आहे. प्रशासनाला कार्यक्षम बनवणे आणि प्रलंबित विकासकामांना गती देणे यामुळे सामान्य जनतेत समाधानाचे वातावरण आहे. हाच सकारात्मक बदल पचवणे कठीण जात असल्याने जुने सत्ताधारी अस्वस्थ झाले असून, त्यातूनच नव्या नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.

तालुक्यातील तरुण पिढी आता जागरूक झाली असून ती केवळ भाषणांवर नाही तर परिणामांवर विश्वास ठेवत आहे. आमच्या पिढीला रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवणारेच आता आमच्या नावाने भीतीचे वातावरण रंगवत आहेत, अशी भावना तरुणांमध्ये आहे. संगमनेरचा स्वाभिमान हा कोणत्याही एका घराण्याचा नसून तो जनतेचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे. संगमनेरकर आता मागे वळून पाहणार नाहीत. सत्तेतून बाहेर गेल्यावर आठवलेली दहशत ही केवळ एक ‘राजकीय सोय’ आहे. जनता आता विवेकी निर्णय घेणारी असून विकासाच्या प्रवाहात अमोल खताळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!