Sat. May 30th, 2026

संगमनेर –

अमृत उद्योग समूहाचे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीचे (प्रेरणा दिन) औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०१ बाटल्या रक्ताचे संकलन केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी रक्ताची कृत्रिम निर्मिती करणे शक्य नाही. वाढते अपघात आणि आजारांमुळे रक्ताची गरज मोठी आहे. अशा वेळी कुणाचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. रक्तदान हेच जगातील सर्वश्रेष्ठ दान असून, सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवला जात आहे.

या शिबिरात एक विशेष योगायोग जुळून आला. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांनी आपले १०१ वे रक्तदान पूर्ण केले. कारखान्याचा १०१ रक्तदात्यांचा आकडा आणि मस्के यांचे वैयक्तिक १०१ वे रक्तदान, या दुग्धशर्करा योगायोगाबद्दल आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी सांगितले की, भाऊसाहेब थोरात यांनी दिलेली सामाजिक संस्कारांची शिदोरी कर्मचारी आजही जपत आहेत. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले, तर सेक्रेटरी किरण कानवडे यांनी आभार मानले.

यावेळी कारखान्याचे संचालकांसह अर्पण रक्तपेढीचे प्रतिनिधी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!