संगमनेर – संगमनेर तालुक्यातील डिग्रस-अंभोरे मार्गावर बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी शाळेत निघालेल्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या मानेला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, रस्त्यावरून जाणाऱ्या काही सतर्क नागरिकांनी वेळीच आरडाओरडा करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि मुलीचा जीव वाचला.

डिग्रस येथील नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शाळेकडे जात असताना, रस्त्यालगतच्या शेतातील गिन्नी गवत आणि कपाशीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. बिबट्याने थेट तिच्या मानेला चावा घेऊन तिला फरफटत गवतात ओढून नेले. हा हृदयद्रावक प्रकार पाहून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याला प्रतिकार केला. नागरिकांच्या सामूहिक धाडसामुळे बिबट्या घाबरून पळून गेला.
या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेला व गळ्याला खोल जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तात्काळ नागरिकांनी तिला उपचारासाठी संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुभाष धानापुणे यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि भक्षक बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला बोलावण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वन विभागाच्या ‘निष्क्रिय’ कार्यप्रणालीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. बिबट्याच्या भीतीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, शाळांना संरक्षण द्यावे आणि परिसर बिबटमुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, बिबट्यांचा बंदोबस्त न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी वन विभागाला दिला आहे.