Sat. May 30th, 2026

संगमनेर (प्रतिनिधी):

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी आलेली लाखो रुपयांची घंटागाडी गेल्या चार वर्षांपासून धूळखात पडली असतानाच, याच गोदामात राष्ट्रपुरुषांच्या फोटोंची अत्यंत अपमानस्पद अवस्थेत विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

गावातील कचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिबलापूर गावाला लाखो रुपये खर्चून घंटागाडी देण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही गाडी गेल्या चार वर्षांपासून एका खाजगी गोदामात बंद अवस्थेत आहे. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असताना, सरकारी मालमत्ता अशा प्रकारे सडत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ज्या गोदामात घंटागाडी उभी आहे, तिथेच आपल्या देशाच्या महापुरुषांच्या तसबिरी (फोटो फ्रेम) अत्यंत विदारक आणि अपमानस्पद अवस्थेत जमिनीवर फेकून दिल्याचे आढळले. एकेकाळी सन्मानाने भिंतीवर असणारे हे फोटो आज धुळीत आणि अडगळीत पडलेले पाहून शिवप्रेमी व नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही केवळ प्रशासकीय चूक नसून महापुरुषांचा घोर अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.

काही सुज्ञ नागरिकांनी या प्रकाराबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरण्यात आली. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र सतर्क नागरिकांनी या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण (Video) केल्याने प्रशासनाचा हा काळा कारभार उघड झाला आहे. या व्हिडिओमध्ये कचरा गाडीची दुरवस्था आणि महापुरुषांच्या फोटोंची विटंबना स्पष्टपणे दिसत आहे.

या प्रकरणी गटविकास अधिकारी (BDO) आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. संबंधित ग्रामसेवक आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, यासाठी ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!